वादग्रस्त विधान करणाऱ्या गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा : श्रीकांत शिंदे

पंढरपूर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कडून पडळकरांचा निषेध

पंढरपूर : ईगल आय मीडिया

सध्या देशात व राज्यातील काही भागात लॉकडाऊन असताना भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर येथे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करून देशात व राज्यातील राजकीय वातावरण गढूळ केले आहे. सामाजिक शांतता भंग होवून दोन समाजात तेढ निर्माण होवून कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे व राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण पवार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

श्रीकांत शिंदे म्हणाले की, आजपर्यंतच्या राजकीय इतिहासात शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांवर फक्त टिका केली गेली. मात्र त्यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर कोणीही बोलले नव्हते. आजपर्यंत ज्या ज्या नेत्यांनी पवारसाहेबांवर आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आरोप केले ते एकही आरोप सिध्द झालेला नाही. केवळ प्रसिध्दी मिळण्यासाठी व मिळालेली आमदारकी टिकविण्यासाठी तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सोलापूर दौऱ्यावर आल्यानंतर शाबासकी घेण्यासाठी गोपीचंद पडळकर यांनी केलेली ही नौटंकीच आहे, असेही त्यांनी टीका केली.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पडळकर यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष संदीप मांडवे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!