नगरसेवक विक्रम शिरसट यांचा ईशारा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूरात उभारण्यात येत असलेल्या प्रधानमंत्री गृहप्रकल्पास केवळ राजकीय द्वेषातून विरोध करण्याचे काम काही राजकीय नेत्यांकडून करण्यात येत असून राज्यात सत्तेवर असलेल्या एका पक्षाच्या काही पदाधिकाऱ्याकडून सदरच्या प्रधानमंत्री गृहप्रकल्प योजनेस विरोध करण्याचे काम सुरू आहे. सदरच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मंत्रालयातून या प्रकल्पावर स्थगिती आणलेली आहे. यामुळे गोरगरीब पंढरपूरकरांना आपल्या हक्काच्या घरापासून वंचित रहावे लागणार आहे. सदरच्या कृत्यामुळे गोरगरीब जनताच त्यांना धडा शिकवेल तसेच प्रधानमंत्री गृहप्रकल्पावरील स्थगिती त्वरित न उठविल्यास पंढरपूर शहरातील नागरिकांना सोबत घेवून जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा नगरसेवक विक्रम शिरसट यांनी दिलेला आहे.
गोरगरीब जनतेला हक्काचे घर मिळावे म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून गोरगरीबांना घर मिळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महाराष्ट्रात सध्या इतर कोणत्याही ठिकाणी सदरचा प्रकल्प सुरू नसून फक्त तिर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर शहरात सुमारे 2100 घरांच्या भव्य प्रकल्पाचे काम सुरू आहे. यासाठी स्व.सुधाकरपंत परिचारक व आमदार प्रशांत परिचारक यांच्या माध्यमातून सदरचा प्रकल्प सुरू करण्यात आलेला आहे. केवळ
पंढरपूरात साकारण्यात येत असलेल्या गृहप्रकल्पासाठी गोरगरीब नागरिकांनी हात उसने किंवा पतसंस्थांमधून कर्ज काढून पैसे सदरच्या प्रकल्पात गुंतवणूक केलेली आहे. सदरच्या प्रकल्पामुळे गोरगरीबांना हक्काचे घर मिळणार असताना केवळ हा प्रकल्प परिचारक यांच्या माध्यमातून पंढरपूरात उभारला जात असल्याने या प्रकल्पाला विरोध करण्याचे काम सध्या होत आहे. या प्रकल्पामुळे पंढरपूर शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
विशेष म्हणजे सदरच्या प्रकल्पास केवळ पूररेषेत येत असल्याचा आक्षेप घेवून विरोध करण्याचे काम केले जात आहे मात्र शहरातील बहुतांश भाग हा पूररेषेत येत असताना केवळ याच प्रकल्पाला विरोध का ? असा प्रश्न आता पंढरपूरकरांना पडलेला आहे. सदरचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू होते ते आता पुर्णत्वास आलेले आहे सदरच्या घरांचा ताबा आता नागरिकांना देण्यात येणार आहे अशावेळी विरोधकांनी राजकारण करून विरोध केल्याने सदरच्या प्रकल्पास स्थगिती देण्यात आलेली आहे. यामुळे गोरगरीब जनतेतून नाराजीचा सूर ऐकावयास मिळत आहे.
या प्रकल्पासाठी लाभार्थी असलेल्या नागरिकांनी सोडत करण्यासाठी पैसे भरलेले आहेत. सदरची सोडत दि.26 जानेवारी 2021 रोजी होणार होती मात्र सदरच्या स्थगितीमुळे अनेकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. सदर विरोध करणाऱ्या पक्षाच्या नेत्यांना व त्यांच्या उमेदवारांना आगामी निवडणूकीत जनताच धडा शिकवेल असेही नगरसेवक विक्रम शिरसट यांनी सांगितले.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट पक्षनेते अनिल अभंगराव सर पक्षनेते गुरुदास अभ्यंकर नगरसेवक राजू सर्वगोड नगरसेवक डी राज सर्वगोड समाजसेवक अमोल डोके नगरसेवक संजय निंबाळकर यांच्यासह लाभार्थी बहुसंख्येने उपस्थित होते