संभाजी भिडेंचा अजब दावा
टीम : ईगल आय मीडिया
आषाढी वारीला परवानगी द्या, वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे. त्यामुळे वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केली आहे. संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे प्रमुख आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन दिलं.
मानाच्या पालख्यांचे वाहनातून प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी झाली पाहिजे, अशी मागणी संभाजी भिडे यांनी केलीय. तसंच दारुच्या दुकानात जाणाऱ्या तरुणांना पोलीस अडवत नाहीत. पण विना मास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड केला जातोय, असंही संभाजी भिडे यांनी म्हटले आहे.
आषाढी एकादशीला पायी वारीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकऱ्यांकडून केली जात आहे. मात्र राज्य सरकारकडून कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मानाच्या 10 पालख्यांना 100 वारकऱ्यांसह बसमधून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.
त्या पार्श्वभूमीवर आज संभाजी भिडे यांनी वारकरी आणि शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांसह जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन दिलं आहे. त्यात पायी वारीला परवानगी देण्याची मागणी करण्यात आलीय. वारी होत नसल्यामुळे कोरोना वाढत आहे, त्यामुळे वारीला परवानगी द्या, म्हणजे कोरोना जाईल, असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलंय.