आदिम विकास परिषदेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
पंढरपूर : ईगल आय मीडिया
पंढरपूर उपविभागाचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांची बदली होणार असल्याची।चर्चा सुरू असून आणखी किमान 6 महिने तरी।ढोले यांची बदली करू नये अशी मागणी आदिम विकास परिषदेने केली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष नागेश अधटराव यांनी आज जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, पंढरपूर, मोहोळचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे.मात्र या दोन्ही तालुक्यातील कोरोनाची परिस्थिती, सध्या सुरू असलेला पावसाळा आणि संभाव्य पूर स्थिती लक्षात घेऊन आणखी काही महिने ढोले यांच्या सारख्या कर्तव्यदक्ष अधिकार्यांची पंढरपूर विभागात गरज आहे.
मागील साडे तीन वर्षांपासून प्रांताधिकारी सचिन ढोले यानी पंढरपूर, मोहोळ तालुक्यात अतिशय चांगले काम केले आहे. 2017-18 ची दुष्काळी परिस्थिती, 2019 आणि 20 साली आलेली भीमा नदीची पूरस्थिती, गेल्या वर्ष भरापासून सुरू असलेली कोरोनाची महामारी या सर्व संकट काळी मा. ढोले यांनी दिवसरात्र काम केले आहे. सर्व शासकीय विभागांना, सामाजिक, राजकीय संघटनांना एकत्र करून व सोबत घेऊन सर्व सामान्य नागरिकांना त्यांच्यामुळे दिलासा मिळालेला आहे.
त्यामुळे पंढरपूर-मोहोळ तालुक्यातील सर्व सामान्य नागरिक ढोले यांच्या कामावर समाधानी आहे असे दिसते. सध्या पंढरपूर विभागात कोरोनाची महामारी कायम आहे, तसेच पुढील एक दोन महिन्यात अतिवृष्टी झाली तर पूरस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिवाय कोरोनाची तिसरी लाट आली तर तिच्याशी सामना करण्यासाठी आणखी काही महिने ढोले यांची गरज सामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे. तरी आमच्या विनंतीचा विचार करून आणखी किमान 6 महिने तरी ढोले यांची बदली करू नये, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.