स्वेरी फार्मसीमध्ये ऑनलाईन पालक मेळावा संपन्न

पंढरपूर : ईगल आय मीडिया

गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाईन पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. हा ऑनलाईन पालक मेळावा ‘वेबेक्स मिट’ या अँपद्वारे स्वेरीचे संस्थापक सचिव डॉ.बी.पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

प्रारंभी पालक मेळाव्याचे समन्वयक प्रा. प्रज्ञा साळुंखे यांनी ऑनलाईन पालक मेळावा आयोजित करण्यामागचा हेतू स्पष्ट करून ऑनलाईन क्लासेस सुरू असल्याची माहिती दिली. त्यानंतर प्रा. महेश शिंदे यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपलब्ध करून दिलेल्या ‘कोर्सेरा’ कोर्सेस संबंधी सविस्तर माहिती दिली. हे कोर्सेस विद्यार्थ्यांना स्वेरी कॅम्पसच्या माध्यमातून मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर कॉलेजमधील प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसाठी डिझाईन केलेल्या वेगवेगळ्या कोर्सेसची माहिती सांगितली.

यावेळी डॉ. मिथुन मणियार यांनी पालकांना असणाऱ्या विविध शंकांचे निरसन केले. प्राचार्य डॉ. अमित गंगवाल पालकांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘पाल्य घरी असताना पालकांनी जाणीवपूर्वक लक्ष द्यावे तसेच आपला पाल्य नेमका काय अभ्यास करतो याची संबंधित शिक्षकांकडूनही माहिती घ्यावी.’ हा पालक मेळावा संपन्न करण्यासाठी पालक मेळाव्याचे सहसमन्वयक प्रा.ज्योती मोरे तसेच ट्रेनिंग व प्लेसमेंटचे विभागप्रमुख प्रा. प्रदीप जाधव यांच्यासह इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या पालक मेळाव्याचे आभार प्रा. रामदास नाईकनवरे यांनी मानले.

Leave a Reply

error: Content is protected !!