अन्न पाण्यावाचून मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज
टीम : ईगल आय मीडिया
नागपूर येथील जुनी कामठी परिसरात उपासमारीमुळे दोन प्रौढ बहिणींचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बंद घरात त्यांचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी हा प्रकार उघडकीस आला.
कल्पना नागोराव लवके (३१) आणि पद्मा नागोराव लवके (६०) अशी मृत बहिणींची नावे आहेत. दोघीही बहिणी अविवाहित होत्या व काही प्रमाणात मनोरुग्ण असल्याची चर्चा परिसरात आहे. आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्या दोघीच राहायच्या. रोजगार काहीच नव्हता. त्यांच्या घराचे दार नेहमीच बंद असायचे. बुधवारी नगरपरिषदेचा कर्मचारी संपत्ती कर वसुलीसाठी गेला असता त्याला प्रतिसाद मिळाला नाही. पण, आतून दुर्गंध येत असल्याने दार ढकलून बघितले असता दोघींचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होते. घरात अन्नाचा एकही कण नव्हता असे तपासावेेळी दिसुुन आले.
आत्महत्येच्या कुठल्याही खुणा दिसत नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा मृत्यू उपसारमारीमुळे झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे योग्य कारण स्पष्ट होईल.