सोलापूर : ईगल आय मीडिया
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा जागतिक योगदिन फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती पतंजली योगपीठच्या महिला केंद्रीय प्रभारी सुधा अळ्ळीमोरे यांनी दिली.
येत्या २१ जून रोजी सहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा केला जाणार आहे. मागील पाच वर्षापासून हा दिवस आपण अत्यंत उत्साहाने साजरा केला आहे. भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिना निमित्ताने होते. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्ताने योगाला घराघरात पोचवण्याचे योगगुरू स्वामी रामदेवजी महाराज यांचे स्वप्न पूर्ण झाले.
यावर्षी रविवार दिनांक २१ जून २०२० रोजी हा योग दिवस कोरोनामुळे सामुहिकपणे साजरा करता येणार नाही. पण या महामारीवर मात करण्यासाठी योग साधना हेच सर्वात मोठे औषध आहे. म्हणून हा योग उत्सव आपण पतंजली योग समिती व वेगवेगळ्या योग संघटनेच्या माध्यमातून फेसबुक लाईव्हच्या मदतीने आपण घरीच साजरा करणार आहोत. रविवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत पतंजली योग समिती महाराष्ट्रद्वारा प्रत्येक जिल्ह्यातून फेसबुक लाईव्ह द्वारा हा कार्यक्रम होणार आहे. तरी नागरिकांनी आस्था चॅनल तसेच फेसबुक लाईव्हद्वारे कार्यक्रम पाहून आपण घरीच योग करुन आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करावा, असे आवाहन अळ्ळीमोरे यांनी केले आहे.