शहीद भगतसिंग यांच्या जयंती निमित्त भगतसिंग विद्यार्थी परिषदेचा उपक्रम : 4 दिवसात ७०० पुस्तके जमा
पंढरपूर : ईगल आय मीडिया
शहीद भगतसिंग यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील मध्यवर्ती जिजामाता उद्यानालगत असलेल्या हुतात्मा स्मारकात वाचनालय सुरू करण्यात आले आहे. वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात सक्रीय असलेल्या तरुणांनी यासाठी पुढाकार घेत चार दिवसातच ७०० पुस्तके वाचकांना उपलब्ध केली आहेत. यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, गोपी वाडदेकर, बाळासाहेब बागल, विश्वजित भोसले, संतोष कवडे आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपालिकेच्या अखत्यारीत असलेल्या हुतात्मा स्मारकात पूर्वी वाचनालय चालविले जात होते. मात्र, काही कारणांनी ते बंद पडल्यापासून या इमारतीसह परिसर अडगळीत होता. जुगारी, तळीरामांचा येथे वावर होता. लगतच राजमाता जिजाऊंचा पुतळा, त्यांच्या नावाने चालणारे उद्यान तसेच हुतात्मा स्मारक असताना या परिसराची दुरावस्था शहरवासीयांना अस्वस्थ करत होती. त्यामुळे इमारतीचा सदुपयोग करण्याचे ध्येय ठेवून वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेेेचे पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी नागरपालिकेेकडे पाठपुरावा केला.
कार्यक्रमासाठी किशोर मोळक, सत्यम धुमाळ, प्रसाद सातपुते, रुपेश भोसले, अनिकेत मेटकरी, अक्षय साबळे, कपिल गायकवाड, ऋषीकेश रोकडे यांनी परिश्रम घेतले.
दरम्यान, विद्यार्थी परिषदेने केलेल्या ‘पुस्तक दान’ आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील अनेकांनी सुमारे ७०० पुस्तके भेट दिली. या प्रेरणादायी ठिकाणी वाचन चळवळ वाढवून तरुण पिढीचे मन, मनगट, मस्तक सशक्त करण्याचा आमचा मानस असल्याचे सत्यम धुमाळ यांनी सांगितले. येणाऱ्या काळात सर्वांनी या वाचनालयात मदत करावी तसेच लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.