राजद नेत्याचा राहुल गांधींवर आरोप
टीम : ईगल आय मीडिया
बिहार विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे नेते खा.राहुल गांधी शिमला येथे पिकनिक करीत होते असा आरोप राजदचे जेष्ठ नेतेशिवानंद तिवारी यांनी केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप – जदयू यांच्या एनडीए ने 125 जागांसह बहुमत मिळवले आहे. तर महाआघाडीला ११० जागा मिळाल्या असून काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे महाआघाडीला अपयशाला सामोरे जावे लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच आता राजदने काँग्रेसवर टीका करण्यास सुरुवात केली असून राजदचे नेते शिवानंद तिवारी यांनी राहुल गांधींवर निशाणा साधला आहे.
“बिहार निवडणूक सुरु असताना राहुल गांधी शिमला या ठिकाणी गेले होते. पिकनिकचा आनंद लुटत होते. पक्ष अशा प्रकारे चालवला जातो का? राहुल गांधी यांच्या कार्यशैलीमुळे भाजपाला मदतच होते आहे” असा आरोप तिवारी यांनी केला आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ७० जागा लढवल्या होत्या. राहुल गांधींनी फारशा सभाही घेतल्या नाहीत तसंच राहुल गांधी हे बिहारमध्ये फक्त तीन दिवसांसाठी आले होते. प्रियंका गांधी तर बिहारमध्ये फिरकल्याच नाहीत. कारण बिहारशी त्यांचा फारसा परिचय नाही असंही शिवानंद तिवारी म्हणाले.