पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे !


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातले पांडुरंगाच्या चरणी साकडे

पंढरपूर : ईगल आय मीडिया

पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. यावेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्यावतीने मुख्मंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले, मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे, असेही मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले. आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

मानाचे वारकरी विणेकरी केशव शिवदास कोलते, जि. वर्धा (वय ७१ वर्ष) यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते सौ. इंदुबाई केशव कोलते (वय ६६ वर्ष) यांचा सत्कार करण्यात आला. त्यांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्यावतीने मानाचे वारकरी या नात्याने देण्यात येणाऱ्या एक वर्षाचा मोफत पास मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला


पंढरपूर नगरपरिषदेस राज्य शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या यात्रा अनुदानाच्या पाच कोटी रुपये रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
महापुजेनंतर मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या छायाचित्राचे अनावरण करण्यात आले. मंदिर समितीने या छायाचित्राचे पुस्तक स्वरुपात जतन करुन हा वारसा जगापुढे ठेवावा, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गाहिनाथ औसेकर यांनी केले तर सुत्रसंचालन मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी केले.

One thought on “पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे !

Leave a Reply to Santosh Halkude Cancel reply

error: Content is protected !!