कोरोनाने घेतला युवा आय ए एस अधिकाऱ्याचा बळी

सुट्टी काढून गावी आले : गावातच कोरोना बाधित झाले

टीम : ईगल आय मीडिया

त्रिपुरा राज्याच्या वित्त विभागाचे सचिव असलेले परभणी जिल्ह्यातील 35 वर्षीय आय ए एस अधिकारी सुधाकर शिंदे हे सुट्टी काढून गावी आले आणि गावात आल्यानंतर कोरोना बाधित झाले. त्यातच2 त्यांचा उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. एका युवा अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दोन आठवड्यांपूर्वी सुधाकर शिंदे हे पत्नी व मुलीसह चौदा दिवसांची सुट्टी घेऊन आपल्या गावी आले होते. त्रिपुरा केडरच्या २०१५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सुधाकर शिंदे हे मूळचे परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्याच्या उमरा येथील रहिवाशी आहेत. आपल्या गावी येण्यासाठी शिंदे यांनी १८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२० अशी चौदा दिवसांची रजा घेतली होती.

दरम्यान, गावातच त्यांना करोनाची बाधा झाली. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावर सर्वप्रथम नांदेडच्या गुरूगोविंदसिंग शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. प्रकृती सुधारत असताना त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. पण त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली आणि त्यांना औरंगाबादहून पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले.  मात्र आज उपचारा दरम्यान शिंदे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, वडील, चार भाऊ, तीन बहिणी असा परिवार आहे.

त्रिपुरा येथील वित्त विभागाचे सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व कोषागार संचालक पदाचा अतिरिक्त पदभार अशा जबाबदाऱ्या त्यांच्यावर होत्या. मूळचे  मराठवाड्याच्या परभणी जिल्ह्यातील असलेले सुधाकर शिंदे यांचे आज करोनामुळे पुण्याच्या रुबी रुग्णालयात निधन झाले. अवघ्या पस्तीसाव्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

One thought on “कोरोनाने घेतला युवा आय ए एस अधिकाऱ्याचा बळी

  1. आयएएस अधिकारी असलेल्या शिंदे साहेबांच्या जाण्याने एक प्रशासकीय विकासरत्न हरपला, अत्यंत दुखद घटना. भावपूर्ण श्रद्धांजली..

Leave a Reply to Santosh Halkude Cancel reply

error: Content is protected !!