18 ऑक्टोबर ; गेल्या वर्षी पावसात आणि यंदा शेतीच्या बांधावर

खा. शरद पवार यांचा मराठवाडा अतिवृष्टी नुकसान पाहणी दौरा

टीम : ईगल आय मीडिया

राष्ट्रवादी चे अध्यक्ष खा. शरद पवार हे कधीही स्वस्थ बसणारे व्यक्तिमत्त्व मानले जातात. गेल्यावर्षी 18 ऑक्टोबर रोजी सातारा येथील भर पावसात केलेल्या ‘त्या’ सभेला वर्षपूर्ती होत असतानाच यंदा 18 ऑक्टोबर रोजी खा. शरद पवार हे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी चिखल तुडवत बांधावर ,शेतात पोहोचले आहेत.

मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणखी अशा पाहणीचे नियोजन करीत असताना खा. पवारांनी प्रत्यक्ष दौरा सुरू केला आहे. वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. पवार यांनी सकाळी तुळजापूर-परंडा तालुक्यातील नुकसानीची पाहणी केली.

गेल्या वर्षी 18 ऑक्टोबर रोजी सातारा येथे जिल्हा परिषदेच्या मैदानात खा शरद पवारांनी भर पावसात सभा घेतली होती. त्या सभेमुळे राज्यातील राजकीय वातावरण बदलले आणि सत्तेत येण्याची औपचारिकता बाकी असलेल्या भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले. ज्या दिवशी ती निर्णायक सभा झाली त्याच दिवशी एक वर्षानंतर पुन्हा खासदार शरद पवार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहेत.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुफान पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पावसामुळे हातचं पीक गेल्याने बळीराजा अडचणीत सापडला असून, शेतकऱ्याला दिलासा देण्याची मागणी विरोधकांसह विविध घटकांकडून केली जात आहे.

राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात झालेल्या पिकांच्या नासाडी पाहणी करण्यासाठी शरद पवार दौरा करत असून, दौऱ्याची सुरूवात उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूरपासून केली. तुळजापूरपासून गाडीतून काकांब्रा, लोहारा, सास्तुरा या गावांचा दौरा करत पवार पुढे रवाना झाले. यावेळी कांकाब्रा ते सास्तुरा गावांच्या दरम्यान शरद पवार यांनी गाडी थांबवून शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या. अनेक शेतकरी हातात भिजलेली पिकं घेऊन त्यांना दाखवत होती.


खा. शरद पवार दोन दिवस मराठवाड्याचा दौरा करणार असून, यादरम्यान पावसामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यांना भेटी देणार आहेत. १९ आणि १९ ऑक्टोबर असा दोन दिवस हा दौरा असणार आहे.

One thought on “18 ऑक्टोबर ; गेल्या वर्षी पावसात आणि यंदा शेतीच्या बांधावर

  1. “झाले बहु होतील बहु परी या सम हा” या उक्तीप्रमाणे यांचे कार्य थक्क करणारे होते, हा इतिहास विरोधक तर सोडाच पण देशात याचीच अधोरेखित नोंद झाली, सॅल्युट साहेब, तुमच्या वक्तृत्वाला आणि योग्य वेळेला. 🙏🌹

Leave a Reply to Santosh Halkude Cancel reply

error: Content is protected !!